कर्तव्य... होय तुमचा हक्क आहे

संपर्क: उदय पंडित  ९८८१५७५०३३  भाऊ काटदरे ९४२३८३१७०० 

माणूस साधारणपणे वयाच्या साठीनंतर नोकरीमधून निवृत्त झाला तरी सुद्धा पुढची काही वर्षे तो सक्रीय असतो. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे आजारपण, शारीरिक क्षमता कमी होणे, रस्त्यावरील गर्दी, आत्मविश्वास कमी होणे, अपघात होईल या सारख्या भिती मुळे हळूहळू घरातून बाहेर पडणे कमी होत जाते किंवा केले जाते. त्याचा परिणाम म्हणून हळूहळू जनसंपर्क कमी होतो. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या माणसांचे येणे जाणे कमी व्हायला सुरुवात होते. या वयात मुले मोठी होऊन नोकरीला गावाबाहेर पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात गेलेली असतात. तर काही मुले ही बाहेरच्या देशात सुद्धा गेलेली असतात. त्यांचा संसारही सुरू झालेला असतो. मुलांनाही आपल्या आई वडिलांनी आपल्याकडे येऊन निवांतपणे रहावे असे वाटत असते. पण इतके वर्ष आपण ज्या गावात राहत असतो तिथले आप्तस्वकीय, मित्रमंडळी बऱ्याच वर्षांच्या सहवासामुळे त्यांना चिपळूण सोडून बाहेर जाऊन राहायला आवडत नाही. मुलांचा आग्रह किंवा त्यांच्या आनंद व समाधानासाठी सण, अडीअडचणीला शहरात किंवा परदेशी थोडे दिवस राहावे हे आनंददायी असते. पण कायमचे वास्तव्य नको असते. शहरात किंवा परदेशात फार कोणी ओळखीचे नसते त्यामुळे वेळ जात नाही. आपल्यामुळे कोणाची अडचण हाऊ नये व आपल्याला आपल्या मनासारखे जगता यावे अश्या वेगवेगळ्या कारणाने प्रत्येकाला इतके वर्ष राहिलेल्या आपल्या गावातच आपल्या घरातच राहावे असे वाटत असते. पण मग आपण गावात आपल्या घरात राहणार असे ठरवले व राहत असलो तरी त्यात आपले वय व अचानक येणाऱ्या आजारपणामुळे जर काही अडचण झाली तर आपण झटकन हाक कोणाला मारायची असा प्रश्न पडतो. आपल्याला मदत कोण करेल? ही मोठी शंका आपल्या मनात सतावत असते. प्रत्येकाची आपल्या गरजेच्या वेळी धावून येतील अशी काही नातलग किंवा मित्रमंडळी असतातच. पण आयत्यावेळी जर कोणी काही कारणाने उपलब्ध नसेल तर काय ही शंका मनात असतेच. या सगळ्या शंका व अडचणीच्या वेळी काहीतरी सामाजिक व्यवस्था असावी असे वाटते. 

त्यासाठीच सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था पुढाकार घेऊन ‘कर्तव्य’ हि निशुल्क सेवा चिपळूण मधील एकटे किंवा पती पत्नी दोघेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रायोगिक प्रकल्प सुरू करत आहोत. सुरवातीला ५०/६० गरजू कुटुंबांचा शोध घेऊन, खरोखरच अशी गरज आहे का? याचा अभ्यास केला जाईल. अश्या सगळ्या व्यक्तींची सभा घेऊन सगळ्यांना उपक्रम का? कशासाठी? त्याचे फायदे तोटे काय आहेत, त्यामधील सेवा घेणारे व देणारे दोघांच्याही कर्तव्य व जबाबदाऱ्या या सगळ्याची चर्चा होईल. त्याची रूपरेषा कशी असेल हे ठरवले जाईल. कामाचा व कायदेशीर तरतुदींचा विचार करून सेवा घेणारे व देणारे दोघांनाही काही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. जी सेवा देणार आहोत तिचा सर्वांना चांगला उपयोग होईल याचा विचार करून व सर्वतोपरी काळजी घेऊन पुढील वाटचाल नक्की करण्यात येईल.