कचरामुक्त किरणविहार संकुल, शिवाजीनगर, चिपळूण.  

               Read this article in English

                               प्रकल्प                                                                                    रहिवाशी सभा 

 

चिपळूण मधील पहिले

कचरा मुक्त किरणविहार संकुल

जागतिक पातळीवर कचरा प्रश्नाने सर्वांची झोप उडवली आहे. भारतातसुद्धा कचरा प्रश्नाने गंभीर रूप घेतले आहे. चिपळूणमध्ये सह्याद्री निसर्ग मित्र, किरणविहार संकुल व चिपळूण नगर परिषद यांनी एकत्रितपणे या समस्येवर मात करण्याच्या दृष्टीने पहिले पाउल उचलले आहे. किरणविहार संकुल, शिवाजी नगर, चिपळूण हि ६९ सदनिका धारकांची सोसायटी चिपळूणमधील किंबहुना कोकणातील पहिली कचरा मुक्त सोसायटी बनली आहे.

किरणविहार संकुलातील ओल्या कचऱ्यापासून करण्यात येणाऱ्या खत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दि. २९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता मा. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी चिपळूणचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, चिपळूण मधील विविध सोसायट्यांचे सभासद उपस्थित राहणार आहेत.  

सदर सोसायटीत सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, उदय पंडित व राम मोने तसेच इतर    कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवण्याबाबत प्रबोधन केले. या सोसायटीतील श्री. तांदळे श्री. कदम, श्री. बुरटे या तीन सफाई कामगारांना गेले महिनाभर ओल्या कचऱ्यापासून कम्पोस्टिंग कसे करावे, सुक्या कचऱ्याचे  वर्गीकरण कसे करावे या बाबत संपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे. सोसायटीचे अध्यक्ष श्री. राजेश पाथरे स्वतः या संपूर्ण प्रकल्पात सहभाग घेत आहेत. तसेच सेक्रेटरी श्री. प्रकाश कदम व सर्व सदनिकाधारक प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. सदर प्रकल्पाला चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच चिपळूण नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे. ओल्या  कचऱ्याच्या कम्पोस्टिंगबाबत  इनोरा बायोटेक, पुणे, यांचे तांत्रिक सहकार्य लाभात आहे.

रविवार दिनांक १५ डिसेंबर २०१९ पासून सदर प्रकल्पात ओल्या कचऱ्याचे कम्पोस्टिंग व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. आता किरणविहार संकुलमध्ये प्रत्येक  घरात ओला कचरा व सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवला जातो. ओला कचरा ६ X ३ X ३ फुटाच्या ४ टाक्यामध्ये टाकून त्याचे कम्पोस्टिंग केले जाते. सर्व सुका कचरा प्लास्टिक, कागद, लोखंड, धातू, कापड, चामडे इत्यादी प्रकारे स्वतंत्र करून आठवड्याच्या शेवटी रिसायकलिंगसाठी भंगारवाल्याला किंवा इतरांना दिला जातो. फक्त  सॅनिटरी कचरा नगरपरिषदेच्या कचरा गाडीत दिला जातो. सदर प्रकल्पात आजपर्यंत ५२० किलो ओला व ४४० किलो सुका कचरा प्राप्त झाला असून त्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करण्यात आले आहे.

कचरा प्रश्न गंभीर असून त्यामध्ये लक्ष घालण्यास, पैसे खर्च करण्यास सुरवातीला कोणी तयार होत नाहीत. यासाठी सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने सुमारे रुपये ७००००/- खर्च करून ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट बनवण्याच्या टाक्या तसेच सुका कचरा ठेवण्याचे ड्रम इत्यादी साधन सामुग्री आणून किरणविहार संकुलमध्ये  हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.          

सदर प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण च्या वतीने केले जाते. याबाबत अधिक माहितीसाठी पुढील ठिकाणी संपर्क साधा Email: This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.    www.snmcpn.org   संपर्क: ०२३५५ २५३०३० भाऊ काटदरे ९४२३८३१७००  उदय पंडित ९८८१५७५०३३, राम मोने ९४२०१५१७००  

सह्याद्री निसर्ग मित्र या गेली २७ वर्ष निसर्ग संवर्धन, नेत्रदान, देहदान, आधुनिक शेती, अपंग सहकार्य इत्यादी विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करत असून यावर्षीपासून संस्थेने घन कचरा व्यवस्थापन या विषयात काम करणे चालू केले आहे. त्यासाठी त्यांनी आय. आय. टी. पवई., इनोरा बायोटेक, पुणे  तसेच इतर अनेक संस्थाकडून तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत असून त्या बाबतचे प्रशिक्षण सुद्धा पूर्ण करण्यात आलेले  आहे. आगामी काळात सह्याद्री निसर्ग मित्रच्या वतीने कोकणातील घन कचरा व्यवस्थापनाबाबत काम करू इच्छिणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना प्रशिक्षण  देण्यात येणार आहे. चिपळूण नगर परिषदेच्या वतीने शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण संस्थांमध्येसुद्धा असे प्रकल्प राबवण्यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे.                                    

सदर उद्घाटन कार्यक्रमाला सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. राजेश पाथरे, अध्यक्ष, किरणविहार संकुल, व श्री. भाऊ काटदरे, अध्यक्ष, व श्री. उदय पंडित, सेक्रेटरी, सह्याद्री निसर्ग मित्र यांनी केले आहे.