द हॅबिटाट ट्रस्ट, नवी दिल्ली या राष्ट्रीय पातळीवरील संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण संस्थेच्या कोकणातील खवले मांजर संरक्षण मोहिमेचा राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. गुरुवार दि. २० डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली येथील किरण नदार म्युझियम ऑफ आर्ट सभागृह, साकेत, नवी दिल्ली येथे रात्री ८ वाजता एका शानदार समारंभात भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा बनवणारे व प्रोजेक्ट टायगर चालू करणारे राष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव क्षेत्रातील दिग्गज डॉ. एम. के. रणजितसिंह व ८.१ बिलियन डॉलर च्या HCL कंपनीची CEO व द हॅबिटाट ट्रस्टची संस्थापक रोशनी नादार-मल्होत्रा यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष व IUCN SSC पँगोलिन स्पेशालीस्ट ग्रुप मेंबर भाऊ काटदरे व प्रकल्प प्रमुख श्री. अभिषेक सिंह यांनी सदर पुरस्कार स्वीकारला. उपस्थितांनी संस्थेच्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच वन्यजीव पत्रकारितेतील ग्रीन ऑस्कर विजेती व तडफदार पत्रकार बहार दत्ता यांनी संस्थेचा गौरव करताना सांगितले की सह्याद्री निसर्ग मित्र ने कोणाच्याही पाठींब्या शिवाय लोकसहभागातून महाराष्ट्रात सागरी कासव संरक्षण उत्तम प्रकारे केले असून ते भारतातील एक सर्वोत्तम काम आहे.

संपूर्ण भारतातून हॅबिटाट ट्रस्ट कडे एकूण ७०० अर्ज म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ग्रँट, लेसरनोन हॅबिटाट ग्रँट, लेसरनोन स्पिसिज ग्रँट या तिन्ही विभागातून प्रत्येकी ३०० पेक्षा जास्त अर्ज आले होते. त्यापैकी संपूर्ण भारतातून लेसरनोन स्पिसिज ग्रँटसाठी पहिल्या क्रमांकाने सह्याद्री निसर्ग मित्रची निवड करण्यात आली.

सर्व ७०० अर्जांमधून प्रथम ३०० जणांना निवडण्यात आले. त्यातील परत प्रशासकीय बाबी तपासून तसेच प्रकल्पाचे महत्व तपासून अंतिम १५ जणांची निवड करण्यात आली. नंतर द हॅबिटाट ट्रस्ट कडून नंतर स्टेफी झेवियर व डॉ. ध्रुव मंकड यांनी प्रत्यक्ष फिल्डवर येऊन सर्व संस्थांचा प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली व लोकांजवळ बोलले. त्यातून नंतर अंतिम मुलाखतीसाठी ९ जणांची निवड करण्यात आली.

अंतिम स्पर्धकांना दिल्ली मध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. तेथे वन्यजीव पत्रकारितेतील ग्रीन ऑस्कर विजेती व तडफदार पत्रकार बहार दत्ता, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा बनवणारे व प्रोजेक्ट टायगर चालू करणारे राष्ट्रीय स्तरावरील वन्यजीव क्षेत्रातील दिग्गज डॉ. एम. के. रणजितसिंह आणि आफ्रिकेमधून आफ्रिकेतील मसाईमारा नेचर कॉन्झरवन्सीजचे सी.ई.ओ. श्री. ब्रायन अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  पॅनल समोर अर्ध्या तासाची कठीण अशी मुलाखत झाली.

त्या मुलाखतीमध्ये पहिल्या गटात लेसरनोन स्पिसिज ग्रँट साठी सह्याद्री निसर्ग मित्र दुसऱ्या गटात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ग्रँट साठी फाउंडेशन ऑफ इकॉलोजीकल सिक्युरिटी (FES) आणि तिसऱ्या गटात लेसरनोन हॅबिटाट ग्रँट साठी रीफ वॉच मरीन कॉन्झरव्हेशन यांची निवड करण्यात आली.

या सन्मानाबरोबरच द हॅबिटाट ट्रस्ट पुढील वर्षभर संस्थेच्या खवले मांजर संरक्षण मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करणार असून ट्रॅप कॅमेरे, जनजागृती, शालेय कार्यक्रम व आदिवासी लोकांना रोजगार यामध्ये आर्थिक मदत सुद्धा करणार आहे.

खवले मांजर हा आय यु सी एन च्या रेड लिस्ट प्रमाणे धोक्यात असलेला सस्तन प्राणी असून त्याच्या संपूर्ण शरीरावर खवल्यांचे आवरण असते. १५ ते २० किलो वजनाचा हा प्राणी निशाचर असून फक्त मुंग्या डोंगळे व वाळवी खातो. जगात सर्वात जास्त शिकार व चोरटा व्यापार या प्राण्याचा होत असून त्याचे खवले चायनीज औषधांमध्ये वापरले जातात. त्यामुळे त्याला खूप किंमत मिळते. गेल्या दोन वर्षांपासून वनविभागाच्या व पोलिसांच्या सहकार्याने सह्याद्री निसर्ग मित्रने खवले मांजर संरक्षण मोहीम चालू केली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मोठ्या प्रमाणात जनजागृती, ट्रॅप कॅमेराच्या सहाय्याने सर्वेक्षण, माहितगार लोकांच्या सहकार्याने अधिक माहिती व स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार, शाळांमध्ये कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमा अंतर्गत यशस्वी प्रकल्प चालू आहे. सदर यशस्वी पुरस्काराबद्दल सर्व स्तरावर संस्थेचे अभिनंदन होत आहे.